डहाणू हा पालघर जिल्हयातील एक आदिवासी बहुल तालुका आहे. तसेच डहाणू तालुका हा मुख्यत्वे डोंगरी व सागरी भागात वसलेला आहे. डहाणू तालुक्याचे क्षेत्रफळ 980.50 चौ.की.मी. असून एकूण लोकसंख्या 402095 आहे. डहाणू तालुक्याच्या उत्तरेस तलासरी तालुका व गुजरात राज्याची सीमा, दक्षिणेस पालघर तालुका, पुर्वेस जव्हार व विक्रमगड तालुका व पश्चिमेस अरबी समुद्र आहे. डहाणू तालुक्याची रचना ही पुर्वेस डोंगराळ व आदिवासी भाग विखुरलेला असून पश्चिमेस समुद्रकिनारपट्टी आहे. तालुक्यातुन मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 8 जातो. सदर राष्ट्रीय महामार्गावर तवा, घोळ, चारोटी, महालक्ष्मी, विवळवेढे, धानीवरी, दापचरी ही डहाणू तालुक्यातील गावे आहेत. डहाणू तालुक्यातून लोहमार्ग जात असून सदरील लोहमार्गावर वाणगाव, डहाणू, घोलवड व बोर्डी ही स्थानके आहेत. डहाणू तालुक्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन भात शेती आहे. तालुक्यात मुख्यत: रिलायन्सचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. तसेच चिंचणी येथील डायमेकिंग लघुउद्योग जगप्रसिध्द आहे. डहाणू तालुक्यात फुगा बणवणाऱ्या कंपनी देखील उद्योगात अग्रेसर आहेत. युनिव्हर्सल कॅप्सुल लि. आशागड, मेहेर डिस्टीलरीज लि. असे नामांकित उद्योग आहेत. जगप्रसिध्द चिकू डहाणू तालुक्यातील घोलवड या गावी पिकवले केले जातात. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिकू व नारळ तसेच इतर फळबागामध्ये लिची, आंबे, फणस, केळी इत्यादी यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. समुद्रकिनारी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली जाते, त्यामध्ये मिरची, वॅनीला, टोमॅटो यांचे लागवड क्षेत्र जास्त असून दररोज मुंबईच्या बाजारपेठेला पुरवठा केला जातो. तालुक्यातींल साखरे, कवडासा व सुर्या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी तसेच शेती साठी देखील वापरले जाते. बोर्डी येथील समुद्र किनारा, डहाणू फोर्ट व चिंचणी समुद्र किनारा ही पर्यटनाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. तसेच विवळवेढे येथील महालक्ष्मीचे जागृत देवस्थान, आशागढ येथील श्री संतोषी माता मंदिर व नरपड येथील श्री साईबाबा मंदिर, कोसबाड येथे जैन मंदिर ही धार्मिक स्थळेहि आहेत. डहाणू तालुक्यात वारली, कातकरी, धोडी, दुबळा, कोंकणा, मल्हार कोळी या आदिवासी समाजाची संख्या मोठया प्रमाणावर आहे. जगप्रसिध्द वारली पेंटींगचा उमग डहाणू तालूक्यात झालेला असून श्री जीव्या म्हसे यांनी वारली पेंटींग या क्षेत्रात उत्तम काम केल्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.